चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील दुंडगे येथील ताम्रपर्णी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या दुरावस्थेसंबंधी बऱ्याच वेळा शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न झाला आहे. याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. पाटबंधारे विभागाने डागडुजी करण्याचे निमित्त दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विषय शासन दरबारी उचलून धरावा. अन्यथा काही दिवसात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील यांनी दिला.
राजेंद्र पाटील म्हणाले की, परिसरातील वाढती लोकसंख्या आणि दळणवळण पाहिले असता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक मोठा पूल या बंधाऱ्यालगत निर्माण होणे गरजेचे आहे. शासनाने त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा. या पुलावरती मोठ्या भेगा पडल्या असून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी प्राधान्याने हा विषय तालुक्यातील सर्व जबाबदार आमदार, जि.प.सदस्य, संबंधित अधिकारी शासन दरबारी उचलून धरून दुंडगे-कुदनूर परिसरातील सर्व नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलनाचा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.