कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थळ : पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल. वेळ : आज (गुरुवार) दुपारचे दोन… करवीर तालुक्यातील एक प्रेमी युगुलाच्या गुजगोष्टी सुरू होत्या. अचानक प्रेयसीने नदीत उडी मारली. मात्र भांबावलेल्या प्रियकराने त्वरित नदीपात्रात उडी घेऊन तिला वाचवले. थोडाही विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता… मात्र, आज दुपारी घडलेल्या या प्रकाराने काही काळ खळबळ उडाली होती.

करवीर तालुक्यातील हे प्रेमी युगुल आज दुपारी शिवाजी पुलावर आले. काही काळ दोघांमध्ये बोलणे झाले, मात्र काय झालं कुणास ठाऊक, तरुणीने अचानक नदीपात्रात उडी मारली. यामुळं प्रियकर क्षणभर भांबावला. पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही धक्का बसला. पण प्रसंगावधान राखत कोणताही विचार न करता प्रियकरानेही नदीत उडी मारली. हा प्रकार पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. काहींनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक युवकांनी देखील पाण्यात उतरून मदतकार्य केले. या सर्वांच्या प्रयत्नाने तरुणीला सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही यात दुखापत झाली नसली तरी घडलेल्या या अजब प्रकाराची चर्चा पंचगंगा परिसरात सुरू होती.