मुंबई : ‘भाजपाच्या जाहीरनाम्यावर आणि मोदीजींच्या दहा वर्षांच्या प्रवासावर टीका करताय, पण त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्यासोबत होता आणि तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात’ असा घणाघात नितेश राणे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे.

दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर लगेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी बेताल टीका करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत अभिनेता सलमान खानच्या  घरासमोर आज गोळीबाराची घटना घडली. यावरुन संजय राऊतांनी सरकारच्या गृहखात्याला लक्ष्य केले. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर मविआच्या काळातील संरक्षणाचे दाखले देत नितेश राणे यांनी राऊतांना सुनावलं आहे.

यावेळी नितेश राणे म्हणाले, भाजपा आणि एनडीएने आज १४ एप्रिललाच जाहीरनामा कसा प्रकाशित केला, यावर हे महाशय भाष्य करतात. दहा वर्षे मोदीजींच्या पूर्ण प्रवासावर टीका हा संजय राऊत करतो. पण २०१४ आणि २०१९ मध्ये जो जाहीरनामा आम्ही बाहेर काढला होता त्याचा भाग तुम्हीदेखील होतात. तुम्ही स्वतःच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी मोदीजींच्या सरकारचा जाहीरनामा वाचून दाखवत होतात. दहा वर्षांवर टीका करत असताना त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्याबरोबरच होता. मग तेव्हा तुम्हाला जाहीरनामा कडू वाटला नाही? संविधान धोक्यात वाटलं नाही? तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात. म्हणून आता तुमच्या टीकेला जनता महत्त्व देत नाही, अशी सणसणीत टीकाही नितेश राणे यांनी केली.

पुढे बोलताना राणे म्हणाले, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज फायरिंग झाली. देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने राज्याला अतिशय कर्तबार असे गृहमंत्री लाभलेले आहेत. म्हणून कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास मी देतो, यावेळेस त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर तोफ डागली.