पुणे (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाचा प्रसार किती होतो आहे, यावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत हिरवा कंदील दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन आम्ही परीक्षा घेतो आहे. युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती, तर आम्ही मेमध्येही परीक्षा घेतली असती. अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी २० मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे.