कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘माझं कोल्हापूर थुंकीमुक्त झालंच पाहिजे’, ‘आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर आपण ठेवलेच पाहिजे’, अशा घोषणा देत ताराराणी चौक दुमदुमून गेला. अँटी स्पीट मूव्हमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेदरम्यान या घोषणा देण्यात आल्या.
अँटी स्पीट मूव्हमेंटचे कार्यकर्त्यांनी आज (रविवार) सकाळी साडेनऊ वाजता सोशल डिस्टन्स ठेवत ताराराणी चौकात वेगवेगळ्या कॉर्नरवर उभे राहून घोषणा दिल्या. यावेळी थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याच्या चळवळीस प्रारंभ झाला. दरम्यान, रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना माहितीपत्रके वाटप करण्यात आली. तसेच थुंकीमुक्त स्लोगन असलेले बॅनर आणि पोस्टर हातात धरून घोषणा देताना चौकात एक वेगळा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या मोहिमेला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाचा प्रसार वाढू नये. तसेच ही अनिष्ट सवय दूर सारून शहर थुंकीमुक्त करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. थुंकीमुक्त कोल्हापूर बनवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिपूरकर आणि सारिका बकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला विविध सामाजिक संस्थांनी पाठबळ दिल्यामुळे आता ही चळवळ सर्वांची बनली आहे. आजची मोहिम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्याला दीपा शिपूरकर, आनंद आगळगावकर, राहुल राजशेखर, कविता जांभळे, अभिजित गुरव, गीता हसुरकर, दीपक देवलापूरकर, भानुदास डोईफोडे, समीर पंडितराव, विजय धर्माधिकारी, कल्पना सावंत, स्मिता देशमुख, नीना जोशी यांचे सहकार्य लाभले.