कागल (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत आहे. तसेच बाधितांच्या मृत्यूची संख्याही घटत चालली आहे. बदलणारी ही स्थिती निश्चितच दिलासादायक आहे, परंतु धोका टळलेला नाही, असा दक्षतेचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आता जरी परिस्थिती चांगली वाटत असली तरी लवकरच हॉटेल, लोकल आणि रेल्वे सेवा तसेच नवरात्रोत्सवाच्या सणामुळे रुग्ण वाढणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी गरजेची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कागलमध्ये डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, कागल तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २२१७ आहे. त्यापैकी १९६८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या १४६ असून दुर्दैवाने १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ६१ कागल शहरातील ३१ आणि मुरगूड शहरातील ११ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, ग्रामीण भागासह कागल नगरपालिका आणि मुरगूड नगरपालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाचे अभियान अत्यंत उत्कृष्ट झाल्याबद्दल मुश्रीफ यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले. तसेच या सर्वेक्षणातूनही रुग्ण निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाल्याचे ते म्हणाले.२०० बेडची सुविधा असलेल्या कागल कोविड केअर सेंटर मधील निम्मे बेड नवीन येणाऱ्या कोरोनाबाधितांचसाठी तर निम्मे बेड कोरोना होऊन बरे झालेले यांच्यासाठी राखीव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी येत्या जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना कोरोनाची लस देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान देशाची १४० कोटी लोकसंख्या असताना नेमके कोणाला..? कोणत्या वयोगटाला व कशी देणार..? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, कोविड केअर सेंटरचे डॉ. अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.