कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वसामान्य वगळता इतरांचे सीपीआर रुग्णालयाकडे नेहमी दुर्लक्ष असायचे, मात्र याच सीपीआरने कोरोना काळात अनेक उद्योगपतींसह लोकांना जीवनदान देण्याचं काम केले, हे विसरून चालणार नाही. सध्या कोरोना आटोक्यात येत असला तरी तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस येईपर्यंत नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या वतीने राज्यात टप्याटप्याने लस देण्याचे नियोजन सुरू आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. ते आज (शनिवार) कोल्हापुरातील पेटाळा येथील गडकरी सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘कोरोना अनलॉक’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविकात या पुस्तकाच्या लेखनामागील उद्देश स्पष्ट केला. जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी अहोरात्र कार्य केल्याबद्दल ना. यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, माजी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के यांच्यासह व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, बंटी सावंत, व्हिजन ट्रस्टचे संताजी घोरपडे, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, वुई केअरचे मिलिंद धोंड यांना कोरोना योद्धा सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रमुख पाहुणे ना. यड्रावकर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, एसटी ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक पोलीस आणि त्यानंतर ५० वर्षावरील वृद्धांना तसेच त्यानंतर इतर लोकांना लस देण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी काम केले असून कोल्हापूर जिल्हा लवकर कोरोनामुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

विविध मान्यवरांनी मनोगतात जिल्ह्यात कोरोनाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन कोल्हापूरकरांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी अक्षर दालनचे अमेय जोशी, पत्रकार, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकार उद्धव गोडसे यांनी सूत्रसंचालन तर विजय केसरकर यांनी आभार मानले.