मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील वृत्तसंस्थांची सर्वात मोठी संघटना असणाऱ्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं (NBA-एनबीए) डिजिटल स्वरुपात बातम्या देणाऱ्या संस्थांनाही संघटनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. News Broadcasts Association या नावाचा विस्तार करून ते News Broadcasts and Digital Association असं केलं आहे. त्यामुळे या संघटनेमध्ये डिजिटल माध्यमांचाही प्रवेश झाला असल्याची माहिती ‘एनबीए’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक रजत शर्मा यांनी दिली.

एनबीए ही टेलिव्हिजन माध्यमातील सर्वात मोठी संघटना असून देशातील सुमारे ८० टक्के माध्यमसंस्था तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत. मागील काही वर्षांपासून डिजिटल मीडियाचा वेगाने विस्तार होत आहे. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणारं आणि वाचकाला सोयीचं ठरणारं माध्यम म्हणून डिजिटल माध्यमाकडं पाहिलं जातं.

रजत शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल मीडियाला संघटनेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय झाला असून लवकरच नामकरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता डिजिटल माध्यमांच्या व्यवसायाशी आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न या संघटनेमार्फत मांडले जाणार आहेत.