कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आज, सोमवारपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. पण मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर घाईगडबडीत पूर्वतयारी नसताना शाळा सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, असे व्टिट शिक्षणमंत्र्यांनी केले आहे. परिणामी, शाळा सुरू करण्याच्या अंतिम निर्णयाची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे पुढे येत आहे. यामुळे पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे आठ महिन्यांपासून माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापकांनी घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संस्थाचालक प्रतिनिधींची बैठक घेऊन २३ तारखेपासून शाळा सुरू कराण्यासंबंधीची बंधने नाहीत. आवश्यक त्या उपाययोजना करूनच शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षणमंत्र्यांनीही शाळा सुरू करण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर घ्यावा, अशी सूचना दिली आहे. ही जबाबदारी कोण घेणार, जबाबदारी घेऊन शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग विद्यार्थी, शिक्षकांना झाला तर काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.