मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष ९ विविध योजनांच्या कामांसाठी देण्यात आलेल्या ५८ कोटी रुपयांवर  स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्याचे आदेश आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. या बैठकीत राधानगरी तालुक्यातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, सचिव (लाभक्षेत्र विकास) विलास राजपूत आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुमारे ५८ कोटी रुपये किंमतीच्या ९ योजनांच्या निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या होत्या. या योजनांमुळे ३४७ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. पालबुद्रुक, नवरसवाडी, पंदीवरे, दुर्गमानवाड आदी भागातील पाझरतलाव, साठवणतलाव, उपसासिंचन योजना, कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधणे आदींसाठी सुमारे ५८ कोटी रुपये खर्चावरील स्थगिती उठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

राधानगरी तालुक्यातील १५ उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षण कामांना निधी उपलब्ध करुन देणार, तसेच भुदरगड तालुक्यातील मेघोली धरणाच्या दुरुस्तीसाठी ४५ कोटी रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय उर्वरित १०० कोटींच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावावर सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याचा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कालवे आणि साठवण तलावांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन होणे काळाची गरज आहे. नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी लाभ व्हावा यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी जलसंपदा-जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना केले.