मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे संबंध बिघडायला खरी सुरुवात झाली ती गेल्या महिन्यापासून, असे शिवसेनेतील सूत्रे सांगतात. या तणावाला आनंद दिघे यांध्यावरील धर्मवीर हा चित्रपट कारण ठरला आहे.

या चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन व्यक्तीरेखा ज्या प्रकारे रेखाटण्यात आल्या आहेत, त्या उद्धव ठाकरेंना पसंत नसल्याचे समोर आले. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना पक्षाकडून महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत डावलण्यास सुरुवात झाली, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य आहे. तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रुग्णशय्येवर पडलेल्या धर्मवीर आनंद दिघेंना भेटण्यासाठी येतात. धर्मवीर, हिंदुत्वाचे काम अजून बाकी आहे, असे अंथरुणाला खिळून कस चालेल? असा सवाल ते दिघे यांना करतात. त्यावर दिघे राज ठाकरेंना उद्देशून ‘यापुढे हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर’ असे म्हणतात. राज ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यावर चित्रीत झालेला हा प्रसंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुपला होता आणि त्यावरून ते एकनाथ शिेंदेवर नाराज होते, असे सांगितले जात

शेवट न पाहताच सोडला चित्रपट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी धर्मवीर चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. आनंद दिघे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जातात आणि गणपतीचे दर्शन घेतात, असा एक सीन चित्रपटात दाखवण्यात आला आहे. हा सीन होईपर्यंतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट पाहिला. त्यानतंर ते तडक उठले आणि चित्रपटगृहातून बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सीन चित्रपटात दिसतो. तो पाहणे टाळण्यासाठीच मुख्यमंत्री बाहेर पडल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अर्थात, आपल्याला दिघे साहेबांचा मृत्यू झाल्याचे पाहवले नसते, म्हणूनच आपण बाहेर पडलो, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले होते.

‘धर्मवीर’ चित्रपटात राज ठाकरे आणि नारायण राणे यांना दाखवण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या अखेरच्या काळात हे दोन्ही नेते त्यांच्या संपर्कात होते; मात्र या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंवर नाराज होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीदरम्यान महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत एकनाथ शिंदेंना सहभागी करून न घेण्यामागेही हेच कारण असल्याची चर्चा आहे. आता ही नाराजी बाजूला ठेऊन उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंची समजूत काढतात की या दोन नेत्यांची मन कायमस्वरूपी दुभंगली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.