बारामती : देशात तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 11 जागांवर आज मतदान पार पडत आहेत. मात्र आजच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच बारामतीमधील मतदार संघातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अंदर दत्तात्रय भरणे हे सुप्रिया सुळे समर्थकाला शिवीगाळ करत धमकी देताना दिसत आहेत. तर रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्याची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

बारामती लोकसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पवार काका – पुतण्यातील या लढाईत निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना होत आहे. भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांविरोधात आमची लढाई ही वैचारिक असल्याचे सुप्रिया सुळे या सुरुवातीपासून म्हणत आहेत. बारामती आणि इंदापूर येथून आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळत आले आहे. आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मतदान केंद्रावरच सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दत्तात्रय भरणे कार्यकर्त्याला मतदान केंद्रावरुन निघून जाण्याचे सांगत आहे. बारामती अॅग्रोचं कोणी तुझ्या मदतीला येणार नाही. या गावात संध्याकाळी सहा वाजतानंतर तुझे आई-बाप मीच आहे, अशी धमकी देताना दिसत आहेत.

कोण आहेत दत्तात्रय भरणे ?
दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते अजित पवारांच्या गटात आहेत. बारामती लोकसभेत ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही ते राहिलेले आहेत.

रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दडपशाहीपुढे न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्रमंडळाचे सदस्य माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा…

या व्हिडिओमध्ये दत्तात्रय भरणे हे सुळेंच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसत आहे.