कागल (प्रतिनिधी) : कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी शैक्षणिक प्रयोगांबाबत स्वानुभवावर लिहिलेले ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाउलवाटा’ हे पुस्तक शालेय गुणवत्ता विकासासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथे  पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते.

यावेळी गटशिक्षणाधिकारी म्हणून शाहुवाडी,  गडहिंग्लज आणि कागल तालुक्यात केलेल्या विविध सकारात्मक प्रयोगांबाबत लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

ना. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. त्यांचे बालपण हरवत आहे. अनेक बालके अनाथ झाली त्यांचे नाथ होण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. डॉ कमळकर यांचे हे पुस्तक शिक्षकांच्यात आत्मविश्वास आणि प्रेरणा जागवण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन केले.

डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, डॉ. कमळकर यांच्या पुस्तकाचे वाचन, मनन करून ते कृतीत उमटवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा अजून सक्षम होतील. संजयसिंह चव्हाण म्हणाले, शिक्षकांनी काळाची पावले ओळखली पाहिजेत.  विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये. डॉ.कमळकर यांच्या पुस्तकाचा समावेश जिल्हा परिषदेच्या पुस्तक यादीमध्ये केला जाईल, असे सांगितले.

यावेळी पं.स. सभापती पूनम मगदूम,  उपसभापती अंजना सुतार, सदस्य रमेश तोडकर,  गटविकास अधिकारी सुशील संसारे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, अमेय जोशी,  चंदकांत निखाडे, विश्वास सुतार आदी उपस्थित होते.