इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मजूरी वाढ घोषित करा. अशी मागणी आज (शुक्रवार) लालबावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांच्या कार्यालयात शॉप इन्स्पेक्टर श्रीमती लोहार यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २०१३ साली झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी यंत्रमाग उद्योगातील कामगारांची मजुरी वाढ घोषित करण्यात यावी असे ठरले होते. त्याप्रमाणे उद्याच्या १ जानेवारी रोजी मागील २०१२१ मधील दोन महागाई भत्ते एकत्र करून त्याप्रमाणे पुढील वर्षांकरिता मजुरी वाढ घोषित करावी अशी मागणी करण्यात आली. तर २०१७ पासून येथील सहाय्यक कामगार आयुक्तांनी केलेली मजूरीवाढ मालकांनी दिलेली नाही त्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगातील कामगारांचे मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरी ताबडतोब सहाय्यक कामगार आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून मजुरी वाढ घोषित करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी लाल बावटा युनियनचे अध्यक्ष कॉ. शिवगोंडा खोत, सेक्रेटरी  भरमा कांबळे, दत्ता माने, आनंदा वाघमारे, सुभाष कांबळे, प्रकाश कारके, गोपाळ पोला, लक्ष्मण बच्चेनटी, सुभाष कांबळे, इंद्रजीत पोळ, रामचंद्र पोला, पदाधिकारी उपस्थित होते.