कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर तब्बल अकरा वर्षानंतर ३१ जानेवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवस ते कोल्हापुरात वास्तव्यास असून, येथूनच त्यांच्या आठ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोल्हापूरचे प्रशिक्षक संतोष लाड यांनी दिली.

श्री श्री रविशंकर यांनी तब्बल ११ वर्षांपूर्वी २०११ मध्ये कोल्हापूरला भेट दिली होती. कोरोना साथीनंतर प्रथमच ते कोल्हापूरला येत आहेत. श्री श्रींच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर ‘भक्ती-उत्सव’, हा महासत्संग कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता तपोवन मैदानावर महालक्ष्मी हवन आयोजित केला आहे. तत्पूर्वी गुरुदेव हे करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत, असेही लाड यांनी सांगितले. लाखो लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या दिमाखदार भक्तिसोहळ्याची जय्यत तयारी सध्या कोल्हापुरात सुरु आहे. हा भक्ती उत्सव यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक, साधक सध्या जोरदार कामाला लागले आहेत.