कागल (प्रतिनिधी) :  महालक्ष्मी दूध संघ अडचणीमध्ये आला त्याचे कारण म्हणजे राजकारण केले गेले. या संघाकडून कोणाचेही देणे शिल्लक राहिलेले नाही. दरम्यान, महालक्ष्मी दूध संघावर खोटेनाटे आरोप करणारे माजी खासदार धनंजय महाडिक भीमा साखर कारखान्यातील गैरव्यवहारामुळे नजीकच्या काळात तुरुंगातच दिसतील, असा दावा मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.

जमादार पुढे म्हणाले  की,  महालक्ष्मी दूध संघाने आता दुसरी व्यवस्था करुन एक लाख लिटरवर संकलन सुरू केले आहे. आमच्यावर आरोप करणारे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पंढरपूरच्या भीमा कारखान्यावर ४०० कोटी रुपये  कर्ज केले आहे. एफआरपी दिलेली नाही.  त्यामुळे साखर आयुक्तांनी साखर जप्त करुन बिले भागविण्याची तयारी सुरू केली आहे. हे खोटे असेल, तर कोणतीही शिक्षा मी भोगण्यास तयार आहे.

शासनाने गळीत हंगाम सुरू रहावा, म्हणून ४० कोटी रुपये थकहमी दिली होती. साखरेची पोतीच गोडावूनमध्ये नाहीत, अशी गंभीर तक्रार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांनी उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे केली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत,  असेही त्यांनी सांगितले.

रणजित पाटलांनी विठ्ठल रुक्माई पतसंस्था मोडून खाल्ली….

सत्ताधारी आघाडीचे उमेदवार रणजितसिंह पाटील यांनी महालक्ष्मी दूध संघावर मुरगुडच्या मेळाव्यात टीका केली होती. त्यांनी तर विठ्ठल रुखमाई पतसंस्था मोडून खाल्ली. शासनाचे पॅकेज घेऊन त्यांनी ठेवीदारांना सहज शासनालाही फसविले. संचालकांना फास लावला. एक संचालक धक्क्याने मृत्यू पावला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकविण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही जमादार यांनी लगावला.