कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कौशल्य निर्मिती आणि विकास या क्षेत्रांमध्ये डॉ. आण्णासाहेब गुरव प्रभावी कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेले ‘स्कील’ पुस्तक निश्चितपणाने सर्वच घटकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. आण्णासाहेब गुरव आणि प्राचार्य डॉ. आर.एस. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘स्कील’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते व्यवस्थापन परिषद सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थी व शिक्षककेंद्री उपक्रम सातत्याने राबविण्यात डॉ. गुरव अग्रस्थानी असतात. त्याचबरोबर विविध कौशल्य विकासाचे उपक्रम राबवून त्यांचा जनसामान्यांपर्यंत प्रसार करण्यासाठीही ते प्रयत्नशील असतात, ही बाब अत्यंत कौतुकास्पद स्वरुपाची आहे. त्यांचे गूळ आणि त्याचे उपपदार्थ याविषयीचे संशोधनही चर्चेत राहिले. नवनवीन कौशल्ये सातत्याने विद्यार्थ्यांना, नागरिकांना प्रदान करीत राहणे, हा त्यांचा महत्त्वाचा गुणविशेष आहे.

यावेळी कौशल्य व उद्योजकता केंद्राच्या वार्षिक अहवालांचेही कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. गुरव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. डी. राऊत, डॉ. केदार मारुलकर आदी उपस्थित होते.