कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचगाव येथील व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील दीड लाख रुपये हिसकावून घेऊन लूट करणाऱ्या सहा जणांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक म्हणाले, दोन ऑक्टोबर रोजी उचगाव रेल्वेब्रीज जवळ एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबतचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारण्याचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथके तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अजय सावंत, महेश पाटील यांना रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगारांनी ही लूट केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

तसेच संशयित संभाजीनगर एसटी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात सापळा रचून संशयित सुमित उर्फ लाल्या सूर्यकांत खोंद्रे वय २४, सौरभ उर्फ डॅनी धनाजी खोंद्रे (वय २० रा. दोघेही धोत्रे तालीमजवळ, शुक्रवार पेठ), रोहन सुहास तडवळे(वय २९, रा. फिरंगाई गल्ली, शिवाजी पेठ) अमित बाळासो कांबळे (वय २५, रा. मुळगाव दापोली, सध्या रा धोत्रे गल्ली,शुक्रवार पेठ), नारायण उर्फ चंद्रकांत वडर (वय २०, रा. धोत्री गल्ली), सौरभ संजय पाटील (वय २०, घाटगे कॉलनी,कदमवाडी) या सहा जणांना पोलीसांनी आज अटक केली. तर त्यांचा आणखी एक साथीदार उमेल मोहम्मद तांबोळी (रा. खडकी बाजार,राम मंदिर जवळ पुणे) याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

नारायण वडर हा याच व्यापाऱ्याच्या दुकानात गेले दीड वर्ष कामाला होता, याचा फायदा घेऊन त्याने साथीदारांच्या मदतीने व्यापाऱ्याला लुटले. अटक केलेल्या सहा जणांकडून रोख १८ हजार रुपये, तीन मोटारसायकली, मोबाईल असा एकूण १ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार, नेताजी डोंगरे, अजित वाडेकर, राजू आडकर, अमोल कोळेकर, नितीन चौधे, श्रीकांत मोहिते, अर्जुन बंदरे, विजय कारंडे, किरण गावडे, संदीप कुंभार, सागर कांडगावे, रणजीत पाटील, रणजित कांबळे, संजय पडवळ यांनी केली.

या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते.