सोलापूर (प्रतिनिधी) : प्रेक्षकांनी गजबजलेल्या टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जवळपास १ हजार मल्लांनी हजेरी लावली होती.


खा.धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखानाच्या वतीने ‘खासदार महोत्सव’ अंतर्गत, चेअरमन विश्वराज महाडिक यांनी काल (रविवार) भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन केले होते. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर कुस्तीचा भव्य आखाडा बनविण्यात आला होता. पै. भीमरावदादा महाडिक, पै.विष्णुपंत भाऊ महाडिक, पै.वनश्री नाना महाडिक, पै.आ.भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.

या कुस्त्यांमध्ये भीमा केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर यांच्यात लढत झाली. १८ ते २० मिनीटे सुरू असलेली कुस्ती चांगलीच रंगली. डाव प्रतिडाव टाकत दोघेही मल्ल आकमक खेळ करत होते.अखेर सिकंदरने प्रदीपसिंगला एकचाक डावावर अस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली.

याशिवाय भीमा कामगार केसरी – पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल भुंदू यांच्यात झाली. दोघेही चपळ असल्याने वेगवेगळे डाव टाकत विजयासाठी प्रयत्न करत होते. अखेर गुणांवर कुस्ती निकाली निघाली. त्यात पृथ्वीराज पाटील विजयी झाला.

तर भीमा सभासद केसरी किताब साठी, माऊली कोकाटे विरुध्द गुरजीत मारगोड यांच्यात लढत झाली. त्यातही माऊली कोकाटे गुणांवर विजयी झाला. भीमा साखर केसरी कीताबांसाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध दिनेश गोलिया अशी लढती झाली. यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी, सिंगल नेल्सन डावावर दिनेशला आसमान दाखवले.

यावेळी खा. धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, चेअरमन विश्वराज महाडिक, व्हाईस चेअरमन सतीश जगताप, आ.यशवंत माने, ‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजीत पाटील, प्रा.शिवाजीराव काळुंखे, मातोश्री मंगलताई महाडिक, ‘भागीरथी’च्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, सरपंच विश्वास महाडिक, पवन महाडिक, विजय महाडिक, भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.