कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध विद्याशाखांच्या अंतिम वर्ष, सत्राच्या परीक्षा या शिवाजी विद्यापीठ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लेखणी आणि अवजार बंद आंदोलनामुळे विद्यापीठाचे या परीक्षांच्या तयारीचे नियोजन बिघडले आहे . किमान एक आठवड्याने या परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अधिकार मंडळाकडून घेतला जाणार आहे.

राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या परीक्षा दि. १० ऑक्टोबरपासून घेण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनचा पर्याय ठेवला आहे. त्यानंतर परीक्षांसाठी एमसीक्यू प्रश्नसंच तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी विद्यापीठाने निविदा प्रसिद्ध केली आहे . त्याची मुदत गुरुवारपर्यंत आहे. एजन्सी नेमल्यानंतर ती किती दिवसांमध्ये परीक्षा घेऊ शकते याबाबतची स्पष्टता होणार आहे, त्यानंतरच या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल.

या परीक्षांचे कामकाज सुरू असतानाच गेल्या ५ दिवसांपासून विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेसह अन्य मागण्यांसाठी लेखणी आणि अवजार बंद आंदोलन सुरू आहे . त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले असून, या परीक्षांची तयारी थांबली आहे. कर्मचारीच नसल्याने प्रश्नसंच तयार करणे, वेळापत्रक बनविणे, आदी कामांचा आढावा घेण्याची प्रक्रिया थांबली आहे. पुढील १ ते २ दिवसांत हे आंदोलन स्थगित झाले, तरी दि. १० ऑक्टोबरपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करणे शक्य नाही. अमरावती विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शिवाय पुणे विद्यापीठही परीक्षा पुढे ढकलणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाकडूनही या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.