कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना पाठोपाठ आता परतीचा पाऊस, चक्रीवादळ आणि इंटरनेट तांत्रिक समस्येमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या परीक्षा आता २६ ऑक्टोंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा २७ ऑक्टोंबरपासून घेण्यात येतील. यासंदर्भातील परिक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे रात्री उशिरा विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेताना मुंबई विद्यापीठात आलेल्या तांत्रिक समस्येची अडचण येथे येऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु यापूर्वी विद्यापीठातील लेखणी बंद आंदोलन तसेच ऑनलाईन सॉफ्टवेअरची कमतरता यामुळे अगोदरच परीक्षा विभागाचे नियोजन कोलमडले होते. अशा स्थितीत १७ ऑक्टोंबर पासून या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या २१ ऑक्टोंबरपासून सुरू होणार होत्या. पण राज्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने, बऱ्याच भागात विजेचा पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा अडथळा आल्यास ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा होण्याची शक्यता आहे.
परीक्षेसाठी एकूण ७४ हजार १७ विद्यार्थी असून, शनिवार पासून होणाऱ्या या परीक्षेसाठी ५० हजार विद्यार्थ्यांकडून नोंदणी झाली आहे. यामध्ये ५० हजार ६२६ विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणारे आहेत. ऑफलाईन परीक्षा देणारे १२ हजार ५६४५ विद्यार्थी आहेत, तर १० हजार ८०९ विद्यार्थ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही.