इचलकरंजी (प्रतिनिधी) : आधीच कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या इचलकरंजीवासियांना आता डेंग्यूचा सामना करणे भाग पडले आहे. शहरात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून १६४ जणांना त्याची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. डेंग्यूचा फैलाव रोख्ण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. आज (बुधवार) याबाबतचे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड व नगरसेविका उमा गौड यांच्यातर्फे इचलकरंजी पालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी कावीळ रोगाची साथ शहरामध्ये पसरली होती व अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मागील दीड वर्षांत शहरात कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. त्यातच आता डेंग्यू रोगाची भर पडली आहे. शहरातील बंडगर माळ परिसरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरामध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारामुळे यांंना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या शहरात १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहात नाही. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी व मृतांच्या परिवारास आर्थिक मदत जाहीर करावी, अन्यथा पालिकेविरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल.

या वेळी नगरसेवक रवींद्र माने, भाऊसाहेब आवळे, नगरसेवक रवींद्र लोहार, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, उप शहरप्रमुख बाळासाहेब मधाळे, युवा सेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, विद्याधर पोवार, दत्तात्रय साळोखे, ऋषिकेश गौड, विजय जोशी, नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.