कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आणि शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आलीत.

यावेळी रावसाहेब दानवे हे वारंवार शेतकरी विरोधात खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करतात याबद्दल त्यांच्या पुतळ्याला कोल्हापूरी पायतानाने मारुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान ‘जय भवानी – जय शिवाजी’, ‘शिवसेनेचा विजय असो’, ‘रावसाहेब दानवे कोण रे पायतानं मारो चोर रे’, ‘या रावसाहेब दानवेचं करायचं काय – खाली डोक वर पाय’, अशी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडला.

महागाई वाढण्याच कारण म्हणजे केंद्र सरकारने निवडणुकीत मोठ्या उद्योजकांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी महागाई वाढवून जनतेकडून वसूल करण्यात येत आहे. तर भाजप सरकारने जनतेला हैराण करून सोडल्याने त्यांना खाली खेचने गरजेचे असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे वारंवार शेतकरी विरोधी वक्तव्य करतात याबद्दल त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास कोल्हापुरी चप्पलाने मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात अरुण अब्दागिरी, अतुल साळोखे, श्रीकांत सोनवणे, रमेश पाटील, शुभांगी साळोखे, दीपाली शिंदे, मेघना पेडणेकर, कमलताई पाटील, स्मिता सावंत, विवेक काटकर, हर्षल सुर्वे, मंजित माने, अभिजित बुकशेट यांच्यासह जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.