उस्मानाबाद (प्रतिनिधी) : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले आता पुन्हा माझ्याशी संपर्क साधू लागले आहेत. मात्र, सोडून गेलेल्यांना आता पुन्हा राष्ट्रवादीत एन्ट्री नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. अर्थात, शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता केलेल्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

रविवारी शरद पवार यांनी तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर तुळजापूर येथे अधिकार्‍यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. आज (सोमवार) तुळजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा उल्लेख न करता उस्मानाबाद जिल्ह्यातून आपल्याला सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षप्रवेश देणार नाही. त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे, असे म्हणत या प्रश्नावर चक्क हात जोडले.