मुंबई – एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत आहे. तर दुसरीकडे सर्व पक्षांची प्रचाराला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप प्रत्यआरोपाचा सत्र सुरु झाला आहे. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात राष्टवादीच्या बड्या नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे . हा बडा नेता दुसरा तिसरा कुणी नसून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलचं उधाण आले आहे. शरद पवार हे सत्तेत भाजपसोबत सहभागी होण्यासाठी 50 टक्के सहमत होते, असा दावा अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की,अजित पवार आणि आमच्या इतर मंत्र्यांनी 2 जुलैला सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्ही 15 आणि 16 जुलै असं दोनवेळा शरद पवार यांना आमच्यासोबत सत्तेत येण्याची विनंती केली. आम्ही शरद पवार यांचे पायही पडलो. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आता जे झालं ते झालं. तुम्ही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला नाही. पण आमची विनंती आहे की, तुम्ही या. आम्ही तुमच्याच नेतृत्वात काम करु इच्छित आहोत. आम्ही प्रयत्न करण्यात कुठेही कमी पडलो नाही. तुम्ही बघितलं असेल, पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. या घडामोडी याच गोष्टीचे संकेत देतात की, आमची बातचित सुरु होती. तसेच शरद पवारही 50 टक्के सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार झाले होते. या गोष्टींनंतर आता जे काही सुरु आहे ते हेतूपुरस्पर सुरु आहे”, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.आता यावर शरद पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे