मुरगूड (प्रतिनिधी) : राधानगरी धरणस्थळी जाणीवपूर्वक घातलेली बंदी झुगारुन शाहूभक्त जनतेने मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी केली. शाहू फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन व पुरोगामित्वाचा बुरखा पांघरुन त्यांच्याच नावाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींना व त्यांच्या नेत्यांना हे चांगलेच खुपले आहे. म्हणूनच ते गोमूत्र शिंपण्याचा कार्यक्रम करणार असल्याचे म्हणत आहेत. या निमित्ताने पुरोगामी विचारांच्या नेत्याला, त्यांच्या पक्षाला व कार्यकर्त्यांना निदान या निमित्ताने पवित्र गोमूत्राची आठवण झाली. हा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराज आणि शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान आहे, अशी टीका मुरगूडमधील शाहूभक्त नागरिकांकडून पत्रकाद्वारे केली आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या मंडळींना आमची एक विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमास आपल्या नेत्याला घेऊन जावे. निदान या निमित्ताने ते धरणस्थळी जातील. ते ज्यांचे नाव घेऊन राजकारण करतात ते छ. शाहू महाराज त्यांना सुबुध्दी देतील की, माझ्या जयंतीनिमित्ताने असले घाणेरडे राजकारण तरी करू नका. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्या या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारची बंदी घालू नका. हा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराज आणि शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान आहे. बहुजन समाज त्याचे योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

या मंडळींनी जयंतीपूर्वी सत्तेतील नेत्याच्या जोरावर प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या जयंतीला परवानगी नाकारुन खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण बहुजन समाजास एकसंघ होण्यापासून रोखण्याचा त्यांचा हा डाव जनतेनेच हाणून पाडला व अभूतपूर्व उत्साहात धरणस्थळी शाहू जयंती साजरी केली. त्यामुळे पोटशूळ उठलेली मंडळी आता पावन भूमीच्या नावाखाली गोमूत्र शिंपण करणार आहेत. अशा विकृत विचारास जनता यापुढे थारा देणार नाही. राजर्षी छ. शाहू जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांचा पुढील काळात धरणस्थळी शाहू जयंती साजरे करुन त्यांचे विचार व कार्य जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, याबद्दल इतका द्वेष का ?

या निवेदनावर अनंतराव फर्नांडिस, विजय राजीगरे, सुशांत मांगोरे, अमर चौगले, सदाशिव गोधडे, विजय गोधडे, युवराज कांबळे, दगडू कांबळे, राहुल कांबळे, मयूर सावर्डेकर, जॉन्सन बारदेस्कर, अनिल अर्जुने, सुहास दरेकर यांच्या सह्या आहेत.