राशिवडे (प्रतिनिधी) : नॅशनल समीट ऑन लीडरशिप इन पॉझिटिव्हीटी २०२२ मध्ये शहीद शिक्षण प्रसारक मंडळास ‘पॉझिटिव्हीटी जेम्स ऑफ इंडिया’ हा सन्मान बहाल करण्यात आला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत एअर मार्शल अजित भोसले यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, प्रा. सागर शेटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ अंतर्गत या समीटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अरुण मिश्रा, राज्यसभेचे अध्यक्ष हरीवंश, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक सकारात्मक उपक्रमांची दखल घेण्यात आली. देश घडविण्याच्या कार्यात देत असलेल्या या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

शहीद महाविद्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११० गावांमधील ९०० हून अधिक विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. येथे कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम.एल.टी., बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कॉम्प्युटर सायन्स, एम.एस्सी मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्यामधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनीसारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत.

विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनिअर्स, डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवेसारख्या खेडेगावात उभे केले आहे.