कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्वाहर्ता आणि पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर गेल्या १०० वर्षांपासून कोल्हापूरच्या मातीत रुजलेल्या मे. रामचंद्र तवनाप्पा मूग या किराणामाल दुकानाने आपल्या व्यवसायात एक खास ब्रॅण्डच नावारूपाला आणला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार शहराप्रमाणेच जिल्ह्यातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी व्यवस्थापनाने विविध ठिकाणी फ्रॅंचाईजीच्या माध्यमातून आपला किराणा माल देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक महिन्यापूर्वी रंकाळा येथे पहिल्या फ्रॅंचाईजीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहूनच आता जिल्हाभर याचा विस्तार केला जाणार आहे, अशी माहिती राहुल महावीर मूग यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर आणि सर्वोत्तम तेच ग्राहकांना देण्याच्या ध्यासामुळे कोल्हापूर शहरापासून ते अमेरिकेत स्थायिक असलेल्या ग्राहकापर्यंत आमची सेवा पोचविण्याचे काम आम्ही पूर्ण करू शकलो असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोल्हापूरसारख्या ठिकाणी किराणामाल दुकानाची फ्रॅंचाईजी देणारे आम्ही पहिले व्यावसायिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

कोल्हापूर येथे पापाची तिकटी या ठिकाणी छोटेखाणी व्यवसाय म्हणून या दुकानाची कै. रामचंद्र तवनाप्पा मूग यांनी सुरुवात केली होती. कोरोनाकाळात देखील सामाजिक बांधिलकी जपत किराणा दुकानाच्या माध्यमातून मूग यांनी घरोघरी जाऊन ग्राहकांना सेवा दिली. याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आणि त्यामुळेच उपनगर व शहर ग्रामीण भागात आम्हाला आपली सेवा द्या, अशी ग्राहकांतून मागणी वाढल्याने आम्ही आता उपनगर आणि तालुक्याच्या ठिकाणी फ्रॅंचाईजी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ज्ञानदेव पाटील, शैलेश गद्रे उपस्थित होते.