चंदीगड (वृत्तसंस्था) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्दी बाजूला ठेवत पंजाब पोलिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे डीआयजी (जेल) लखविंदरसिंग जाखर यांनी राज्यातील प्रधान सचिव (गृह) यांना आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

जाखर यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून सेवेतून अकाली सेवानिवृत्तीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या शेतकरी बांधवांबरोबर आहे. जे कृषी कायद्याविरोधात शांततेत आंदोलने करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी मी राजीनामा देत आहे.

दरम्यान, पंजाबमधील शेतकरी आंदोलनाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. क्रीडा विश्वापासून साहित्य व आणि राजकारणातील दिग्गजही शेतकऱ्यांचे समर्थन करत आहेत. माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंग यांच्यासह दोन डझनहून अधिक खेळाडूंनी सन्मान परत केले आहेत. आता पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेही राजीनामा दिला आहे.