टोप (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक कुटुंबात पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे बीज रुजवल्यास भविष्यात चांगले पर्यावरण निर्माण होईल व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचे आरोग्य सुधारेल, असे मत सरपंच काशीनाथ कांबळे यांनी व्यक्त केले.

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्रीपती चौगुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना कोविडचे डोस देण्यात आले. शिवाय पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गणेशोत्सव काळात मंडळांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला पर्यावरण व आरोग्याबाबत उपाययोजनांची माहिती सांगणे आवश्यक आहे. सध्या देशातील कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडास मास्क लावणे आवश्यक आहे. शिवाय शक्य झाल्यास गर्दीत जाणे टाळले पाहिजे, असे तंटामुक्तचे अध्यक्ष महेंद्र कांबरे म्हणाले.

गावातील १०० लोकांना कोरोनाचा डोस देण्यात आला, तर १३० जणांना पिशव्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संयोजिका पूनम खाडे,  परिचारिका वाघमोडे, मंडळाचे अध्यक्ष विनायक चौगुले, प्रदीप लोहार यांच्यासह बचत गटाच्या  महिला आदी उपस्थित होते. स्वागत प्रदीप लोहार यांनी केले. पोलीस पाटील अमीर हजारी यांनी आभार मानले.