कुंभोज (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त माणगाव ग्रा.पं. च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. माणगावातील प्रत्येक कुटुंबाला तिरंगा ध्वज व भारताच्या संविधानाची प्रत दिली जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.

दि. १४ व १५ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक सरपंच व उपसरपंच म्हणून विधवा महिलांची निवड करून त्यांच्या हस्ते ग्रा.पं. येथे  ध्वजारोहण करण्यात येणार आहे. दि. ८ च्या ग्रामसभेमधील चिठ्ठ्याद्वारे सोडतीनुसार दि.१४ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून वंदना जाधव व प्रतीकात्मक उपसरपंच म्हणून प्राजक्ता पोवार, तसेच १५ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक सरपंच म्हणून सपना सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे. माणगावमधील ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ग्रा.पं. च्या वतीने करण्यात येणार आहे.

युनियन बँक ते शिवतीर्थ पर्यंतच्या सहाशे मीटर मार्गावर दुतर्फा तिरंगा ध्वज फडकवून रस्त्याच्या कडेला भिंतीवर तिरंगा लाईट इफेक्ट्स करण्याबरोबरच डॉ. आंबेडकर पुतळा परिसर, ग्रा.पं. इमारत, शिवतीर्थ या ठिकाणी तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.