सांगली: सांगली लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. तर चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील हे भाजपचे पाकीट घेऊन पाकीट या चिन्हवर निवडणूक लढवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनीही विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सहकारातल्या संस्थेवर जगायची ज्यांना सवय लागली आहे. त्यांनी आमच्यासारख्याची माप काढू नयेत. एकदा तुमच्या भावाचा आणि 2019 ला तुमचा आणि यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असं आव्हान सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना दिले. यावेळी खासदार पाटील यांनी विशाल याच्यावर खरमरीत टीका करताना त्यांच्या भानगडी पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडूनच समजतील असे म्हटले.

संजयकाका म्हणाले मैदान सोडून पळ काढू नकोस असे आव्हान मी विशाल पाटील यांना आधीच दिले आहे. विशाल आता पुन्हा मैदानात आलेला आहे. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल. पुढे बोलताना संजय पाटील म्हणाले, या माणसाने अनेक सहकारातील संस्था बंद पाडल्या. साखर कारखाने, प्रकाश अ‍ॅग्रो,वसंतदादा दूध संघ,सोनी कारखाना, शाबू प्रकल्प, यासह आठ प्रकल्प बंद पाडले. यात भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी विशाल पाटील यांच्यावर केला.

सामान्य माणसाला अडचणीत आणून केले, त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांना सहकारी संस्थेवरच जगायची सवय आहे, त्यांनी आमची मापे काढू नये, मी खमका माणूस आहे, म्हणूनच एकदा तुमच्या भावाला आणि एकदा तुमचा पराभव केला आहे.यावेळीही तुमचा पराभव मोठ्या फरकाने करुन हॅट्रिक करणारच असे म्हणत संजयकाका गुंडगिरी करतो की लोकांना दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांना माहित आहे असेही संजयकाका यांनी नमूद केले.