कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधरांच्या प्रश्नांची आणि समस्यांची जाण असल्याने संग्राम देशमुख यांना भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कर्तृत्ववान नेतृत्वामुळे देशमुख विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजपचे कोल्हापूर शहर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला.

संग्राम देशमुख यांच्या प्रचारानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उदय महेकर होते.

यावेळी संग्राम देशमुख म्हणाले की, कोल्हापुरातील पदवीधर मतदार सुज्ञ आहेत. मतदार बंधू-भगिनींनी मतरूपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी. मी आपल्या प्रत्येक हाकेला धावून येऊन काम करेल.

महेकर म्हणाले की, महाविकास आघाडीचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देणार नाहीत. त्यामुळे संग्राम देशमुख यांचा विजय निश्चित आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माणिक पाटील-चुयेकर, राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते.