मुंबई ( वृत्तसंस्था ) शिर्डी येथे गुरुवारी होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणाना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन राज्यात आता वातावरण तापलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.


मिळालेल्या माहितीनुसार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र परकाळे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी अण्णासाहेब सावंत म्हणाले की, आज मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला आहे, निराशेच्या भावनेने मराठा तरुण आत्महत्या करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचे मत तयार झाले आहे.


राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी असून दोन्ही सरकारे गोलगोल बोलून वेळ मारून नेत आहे. याआधी दिलेले आरक्षण हे योग्य नाही, त्यामुळेच ते टिकले नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आता राज्यामध्ये येत असल्यामुळे त्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

आरक्षणाबद्दल केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यावे अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. उद्या आम्ही सभेला उपस्थित राहून शांततेच्या मार्गाने जाब विचारणार आहोत, मराठा आरक्षणाबाबत आम्ही पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचे सावंत म्हणाले.