कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडे आश्वासनांची खैरात करण्यासाठी पैसे आहेत. ‘गरीब’ मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी पैसे आहेत, मंत्र्यांची मुंबईतील निवासस्थानाची थकलेली बिले भरण्यास पैसे आहेत, परंतु या सरकारला आज दीड वर्ष झाले तरी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत. आगामी अधिवेशनात हा विषय घेऊन शासनाने हे अनुदान त्वरित द्यावे. अन्यथा, प्रामाणिक शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास ते रस्त्यावर उतरतील. तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापुरातील एक मंत्री परवाच म्हणाले की, काहीही झाले तरी आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान देणारच. पण केव्हा ते सोयीस्कररित्या सांगितले जात नाही. यामध्ये शासन चालढकल करीत आहे. शेतकऱ्यांची ही थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू केली. परंतु यामध्ये सुद्धा अजून काही लाभार्थी वंचित आहेत. तसेच दोन लाख रुपयांवरील कर्ज भरल्यानंतर दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही घोषणा अद्याप हवेतच आहेत. बळीराजा शासनाच्या या अनुदानाकडे डोळे लावून बसला आहे. त्यावर राज्य सरकारकडून काहीही सांगितले जात नाही. शेतकरी भीक मागत नाही. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. उद्रेक झाला तर तुम्हाला घराचे बाहेर फिरणे अवघड होईल.

वीज बिलामध्येही फसवणूक

मागील वर्षी विजबिलात जाहीर केलेली सवलतीची घोषणा सरकारने ऐनवेळी मागे घेतली. तातडीने थकीत वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली. कनेक्शन तोडण्याच्या भीतीने सर्वांनी थकीत वीज बिले टप्याटप्याने भरली. पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना वीज बिले भरणे अडचणीचे झाले आहे. बिल वसुलीसाठी घरगुती व शेती पंपाची कनेक्शन तोडली जात आहेत. हा त्यांच्यावरील अन्याय त्वरित थांबवावा.