कोल्हापूर : कोरोना काळापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस अडीच वर्षानंतर धावणार आहे. मुंबईतील सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे ५ नोव्हेंबरपासून रोज कोल्हापुरातून पुण्यापर्यंत सोडली जाणार आहे. निदान पुण्यापर्यंत तरी ही रेल्वे सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सह्याद्री एक्सप्रेस रोज रात्री ११.३० वाजता कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. ती सकाळी ७.४५ वाजता पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री ९.४५ वाजता सुटणारी रेल्वे कोल्हापुरात पहाटे ५.४० वाजता पोहचणार आहे. कोल्हापूर-पुणे या मार्गावर ३१ डिसेंबरपर्यत ही रेल्वे धावेल. पुणे-कोल्हापूर ही रेल्वे ६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत धावणार आहे.

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातच कोरोना काळापासून सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला तिकिट मिळणे मुश्किल बनले होते. त्यामुळे सह्याद्री सुरु करण्यासाठी विविध संघटनांनी दबाव निर्माण केला होता. मध्य रेल्वेच्या बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनीही सह्याद्री सुरु करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून शुक्रवारी घेण्यात आला.

सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने ही रेल्वे तात्पुरती पुण्यापर्यंतच सोडली जाणार आहे. प्लॅटफॉमचे काम संपल्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यत पूर्ववत सुरु केली जाणार असल्याचे समजते. कोरोनाकाळापासून बंद असलेली सह्याद्री एक्सप्रेस निदान पुण्यापर्यंत सुरु झाल्याने प्रवाशांचा त्रास वाचला आहे. ही रेल्वे मुंबईपर्यत लवकरच सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे  मध्य रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले.