टोप (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पेठवडगाव-आष्टा रस्त्यावर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील वडगाव परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले.


यावेळी बोलताना वैभव कांबळे यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील रुपये ४०० रुपये प्रति टन व चालू गळीत हंगामातील तीन हजार पाचशे प्रति टन मिळावेत म्हणून गेले दोन महिने आंदोलन सुरु आहे. सनदशीर मार्गाने निवेदन दिली, मोर्चे काढले तरीसुद्धा शासन व साखर कारखानदार काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. जर लवकरात लवकर ऊस दराचा तिढा संपला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलनाचा इशारा दिला.


यावेळी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब एडके, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, संपत पवार , हरिभाऊ जाधव, सुनील पचीबरे, शिवाजी आंबेकर, राहुल पाटील, सुधीर मगदूम, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.