राशिवडे (प्रतिनिधी) : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा राधानगरीच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांनी आढावा घेतला.

प्रशासनाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा तहसिलदार मीना निंबाळकर यांनी तालुक्यातील गाव निहाय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सोबतच आशा व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेत आहेत. तसेच तहसिलदार थेट ग्राउंड फिल्डवर भेट देऊन आढावा घेत आहेत. तालुक्यात सर्वात मोठ असणारे गाव आणि जास्त असणारे रुग्ण संख्या याचा विचार करता राशिवडे गावात अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

याबरोबरच लक्षण नसणाऱ्या कोरोना बाधितांच्यासाठी कोविड कक्ष उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर ग्रामसेवक शिवाजी आरडे यांनी आजपर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती तहसिलदारांना दिली. सरपंच कृष्णात पोवार यांनी सुद्धा कोरोना काळात केलेल्या उपायांची अंमलबजावणी व केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावर तहसिलदारांनी समाधान व्यक्त केले.

तहसिलदारांनी रस्त्यावरून पायी चालत जात बाजारपेठेतून फेरफटका मारला. यानंतर अंगणवाडी सेविका व आशासेविकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘अर्सनिक अल्बम थर्टी’ या औषध वाटपच्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी त्या अंगणवाडीमध्ये गेल्या. तिथे जमलेल्या नागरिकांचे प्रबोधन करून घ्यावयाच्या काळजीची माहिती दिली.