कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान समिती व प्रशासनाची आढावा बैठक माजी राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली. पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व आरोग्य याबाबत घ्यावयाची काळजी, अपेक्षित गर्दी या सर्व बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलीस विभागाला देखील यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दत्त जयंती सोहळा चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होऊ नये याबाबतची काळजी घ्यावी, असेही त्यांनी मंदिरांचे विश्वस्त व ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितले.

बैठकीस सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच पूनम जाधव, श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव जेरे, सेक्रेटरी संजय पुजारी, अनंत धनवडे, सुभाषसिंग रजपूत, अजित उपाध्ये, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष खोंबारे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पुजारी, विकास कदम, रमेश सुतार, तानाजी निकम, मंगल खोत, विद्या कांबळे, ग्रामविकास अधिकारी बी. एल. टोणे, मदन मधाळे यांच्यासह देवस्थान समितीचे विश्वस्त ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त नृसिंहवाडी येथे महाराष्ट्राच्या सर्व भागांतून लाखो भाविक भक्त येतील, अशी अपेक्षा आहे. दत्त जयंतीनिमित्त सध्या नृसिंहवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.