कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील हरपवडे येथील युवा शेतकरी दिलीप चौगले यांनी आपल्या ओसाड डोंगरी बुरंबाळ शेतीतून रताळ्याचे विक्रमी उत्पादन घेतले. दिलीप हे एक सुशिक्षित युवक आहेत. सध्या शेतीपेक्षा नोकरीकडे युवकांची ओढ जास्त असताना दिसत आहे. तर शेतीतून सुद्धा आपल्याला करिअर करता येते असे दिलीप चौगले यांनी सांगितले.

दिलीप चौगले यांनी आपल्या बुरंबाळ शेतीतून रताळ्याचे उत्पादन घ्यायचे ठरवले. आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यांनी आपल्या वीस गुंठ्यांच्या शेतीतून जवळ जवळ ४० ते ५० हजारांचे उत्पादन घेतले आहे. याचबरोबर त्यांनी अजून आल्ल्याचे उत्पादन घेतले आहे. दिलीप हे वारंवार शेतीतून वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेतीतून ते वेगवेगळी उत्पादने घेत आहेत. यापूर्वी त्यांनी ऊस, भात, भूईमूग, मका, हळद, केळी, भाजीपाला इ. पिकांचे नियोजनबद्धपणे त्यांनी अभ्यास करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

नोकरी मिळणे कठीण असल्याने दिलीप यांनी शेती करायचे ठरविले आणि गेली दहा वर्षे ते शेती पिकवत आहेत. आजपर्यंत त्यांनी आपल्या शेतीतून अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचा हा आणखी एक प्रयोग यशस्वी झाला आहे. आपल्या डोंगरी शेतीतून विक्रमी रताळ्याचे उत्पादन त्यांनी मिळवले आहे. यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. हे दिलीपने दाखवून दिले आहे.