कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची व्यापक जागृती करावी. नगरपालिका क्षेत्रात नगरसेवक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करावी. चौका-चौकात होर्डिंग्ज लावावीत. प्रभागातील घराघरांवर स्टिकर्स लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. ते जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन प्रभावीपणे सर्व्हेक्षणाचे काम करावे. त्यासाठी नेमलेल्या पथकात मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: किमान अर्धा तास सहभागी व्हावे. इली आणि सारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात शोधून त्यांची स्वॅब तपासणी करावी. हॉटस्पॉटचे सर्व्हेक्षण सुरु ठेवावे. पुन्हा पुन्हा सर्व्हेक्षण करावे. एचआरसीटी तपासणी करणाऱ्या लॅबचा ग्रुप करावा. त्यामध्ये तपासणी झालेल्यांचा अहवाल मागवून घ्यावा. नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्या सहकार्याने होर्डिंग उभे करावेत. घराघरांवर स्टिकर लावावेत. विना मास्क फिरणार नाही, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर अधिक भर द्यावा. कारखान्याच्या ठिकाणी नो मास्क, नो वर्क असे फलक लावण्यात यावेत.
यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.