टोप (प्रतिनिधी) : संभापूर (ता. हातकणंगले) गावास आज (बुधवार) ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्कार योजना समितीने भेट देऊन मूल्यांकन केले. 

भाजप सरकारने आणलेल्या ‘स्मार्ट ग्राम’ योजनेच्या नावात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्कार योजना जाहीर केली आहे. या योजनेत गावांचे स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर असे १०० गुणांच्या आधारे गुणांकन होणार आहे. सुंदर गाव पुरस्कार मिळवणाऱ्या गावास १० लाख तर सुंदर जिल्हा पुरस्कार मिळवणाऱ्या जिल्ह्यास ४० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या योजनेत हातकणंगले तालुक्यातील पंधरा गावांनी प्रस्ताव दिला होता. यामधील मूल्यांकन करून मिणचे व संभापूर ही दोन गावांची आज या समितीमार्फत तपासणी झाली. सरपंच प्रकाश झिरंगे यांनी गावात केलेल्या विकासकामाचा आढावा व्हिडिओ स्क्रीनव्दारे दिला व भविष्यातील विकासकामाबद्दल माहिती सांगितली.

या वेळी गटविकास अधिकारी एस. एस. संसारे, सहाय्यक गट विकास अधिकारी आप्पासाहेब माळी, उपअभियंता कोळी, अमोल मुंडे, अरविंद पाटील, विस्तार अधिकारी एस. एम. कुंभार, संतोष पोवार, एन.आर. रामान्ना, ग्रामसेविका आस्मा मुल्ला, उपसरपंच सर्जेराव मोहिते, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.