साळवण (प्रतिनिधी) :  चार दिवसांपूर्वी तळये ग्रामपंचायतीमधील विरोधी पक्षातील सदस्यांनी लोकनियुक्त सरपंचांवरील आरोप पुराव्यासहित सिद्ध करू, असा दावा केला होता. पण माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे तळये ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप भोसले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

ते म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षामध्ये जी काही कामे केली, ती दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही. जी काही विकासकामे केली आहेत. ती सर्व गावकऱ्यांना माहिती आहेत. त्यामुळे माझ्यावर व ग्रामसेवक यांच्यावर जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत, नाहीतर त्यांच्यावर ५० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला, ग्रामसभेच्या बोगस सह्यांचा ठराव मंजूर रकमेचा अपहार तसेच  शिपाई भरती, असे आरोप त्यांनी केले आहे. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत, त्यांनी कोणतीही चौकशी करावी. त्या चौकशीस सामोरे जाण्यास मी तयार आहे. विरोधक म्हणतात की गावाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. मग शाळेमध्ये शौचालय, मंदिर परिसरात शौचालय त्याचबरोबर वाचनालय, दलित वस्तीत गटारे, स्मशानभूमी ही कामे त्यांना दिसत नाहीत का? की त्यांच्या डोळ्यावर झापड आली आहे. पहिली ग्रामसभा कोरोनाच्या कारणामुळे तहकूब करण्यात आली, पण दुसरी ग्रामसभा सोशल डिस्टसिंग ठेवून घेण्यात आली. त्यावेळी ग्रामसेवक, मी स्वतः व सर्व सदस्य हजर होते. त्यावेळी सर्व निर्णय पास करण्यात आले. त्यावेळी लक्षात का आलं नाही? गावातील ग्रामपंचायतीसाठी नेहमी झटणारा व गावासाठी पाणी सोडणारी व्यक्ती निवृत्त झाल्यावर तिच्या घरातील व्यक्तीला नोकरीत प्राधान्य द्यावे, म्हणून  सदर व्यक्तीच्या मुलाला पाणी सोडण्यासाठी घ्यायचे ठरले. यासाठी गावातील तिन्ही गटांसमोर सह्यांद्वारे त्याच्या मुलाला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रसिद्धी फलकांच्या माध्यमातून व सर्वांच्या सह्यांद्वारे संबंधित व्यक्तीच्या मुलग्याला नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी जे आरोप केले आहेत ते सर्व बिनबुडाचे आहेत. हे आरोप विरोधकांनी सिद्ध केले नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल, असा इशाराही सरपंच दिलीप भोसले यांनी दिला आहे.