कोल्हापूर (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या मिळकतीची सीबीआय चौकशी करा, शालेय प्रशासनास धमकी देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणांच्या निनादात आज (गुरुवार) जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने जिल्हापरिषद येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांकडे वर्ग करणे, यासाठी मुख्याध्यापक, प्राचार्य या प्रशासकीय घटकांना माहिती न पाठविल्यास मुख्याध्यापक व क्लार्क यांचे पुढील महिन्यापासून वेतन स्थगित करण्याची धमकी देखील पत्रातून देण्यात आली होती. पगार थांबवण्याची धमकी देणे, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रस्तावाबाबत अर्थपूर्ण व्यवहार करणे, कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणे, शिक्षक संघटनांच्या सहविचार सभा रद्द करणे, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, इत्यादी आरोप संघटना आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यामार्फत पुराव्यासह सादर करण्यात आले.

शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यप्रणाली बाबतही यावेळी आक्षेप नोंदवले गेले. माध्यमिक शिक्षण विभागाची निप:क्षपाती चौकशी झालीच पाहिजे, असा आग्रह मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या परिपत्रकांची होळी करून शैक्षणिक व्यासपीठाने जिल्हा परिषदेसमोर शिमगा केला.

प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा. जयंत आजगावकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, कोल्हापूर महानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक, यावेळी शिक्षक भरतीचे दादा लाड, आर. वाय. मोरे, दत्तात्रय चौगुले, बाबा पाटील, पंडित पोवार, उदय पाटील, संजय सौंदलगे आदी मान्यवर उपस्थित होते.