मिरज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळपुरस्कृत पुणे विभागीय प्रकल्प स्पर्धा शासकीय तंत्रनिकेतन मिरज येथे कर्मशाळा विभागाच्या प्रांगणात संपन्न झाली. या स्पर्धेतंर्गत तंत्रशिक्षण पुणे विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील 26 संस्थानी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन ग्लोबल डेव्हलपर्स चे प्रमुख चैतन्य देवधर यांच्या हस्ते तसेच संस्थेचे प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी चैतन्य देवधर म्हणाले की, नवतंत्रज्ञानाचा वापर नवनिर्मिती आणि समाज उपयोगी ठरवणारा असावा. स्वतःमधील बुद्धिमत्ता लक्षात घेऊन विकसनशील तंत्र निर्मिती करण्यात यावी असे मनोगत व्यक्त केले.

तर नितीन सोनजे यांनी, स्टार्टअप स्कील इंडिया व डिजिटल इंडिया तसेच मेरी माटी मेरा देश अशा नवनिर्मित योजनेअंतर्गत त्याचे धोरण लक्षात घेता उपलब्ध साधनसामुग्रीचा अचूक वापर करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ वतीने स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध प्रकारचे निकष लक्षात घेऊन ही स्पर्धा घेण्यात आली. याचा लाभ विद्यार्थी वर्गाला निश्चितच होणार आहे.

यामध्ये आधुनिक ड्रोन, आयसीयू बेड, आधुनिक पॉवरलाईन सेन्सर, ऑटो इनिक्विटर, पॉवर लाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिक डिव्हाईस, वेब डिझाईन, फायबर ब्रिक्स, महिला सिक्युरिटी पॅनिक अलार्म. ऑईल सिमिलरपी एस बॅलंसिंग, सोलर इलेक्ट्रिक पॉवर बॅकअप कोल्ड स्टोरेज, मेडिकल अॅडव्हान्स ऑटोव्हीलचेअर, परिसर पर्यावरण एअर सोल्युशन उपकरण इत्यादी प्रकल्प सादर केल्याचे सांगितले.

या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टीट्युट, अतिग्रे, जि. कोल्हापूर या संस्थेला कॉस्ट इफेक्टिव इलेक्ट्रिक आयसीयु बेड ड्वेल अॅक्यूवेशन या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयाचे आणि राजगड ज्ञानपीठ टेक्नीकल कॅम्पस पॉलिटेक्निक, भोर जि. पुणे या संस्थेला एस-बाईक या प्रकल्पास द्वितीय क्रमांकाचे पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. व्ही. एम. मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय पुणे चे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

हा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एन.पी. सोनजे यांच्या उपस्थितीत, राहुल रोकडे, उपआयुक्त सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांचे हस्ते संपन्न झाला.