कुंभोज (प्रतिनिधी) : कानाकोपऱ्यात बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहेत. लवकरच घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. यासाठीची मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरू आहे. मात्र, यंदा कच्चा मालावर जीएसटी आकारला जाणार असल्याने गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या आहेत.

महाराष्ट्रासह कोकणात घरोघरी गणेशमूर्ती स्थापन करण्याची प्रथा आहे. यामुळे या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. कोल्हापूर  जिल्ह्यात हजारोंहून अधिक गणेशमूर्ती विक्री केंद्र आहेत. या मूर्तिशाळांमध्ये अक्षय्य तृतीयेनंतरच माती भिजवून मूर्ती कामाला सुरुवात होते, तर काहीजण गणेश विसर्जनाच्या दिवशीच पहिली मूर्ती बनवून नवीन वर्षीचे काम सुरू करतात. मात्र, सध्या सतत वाढणारे इंधनाचे दरांमुळे वाढलेला वाहतूक खर्च, वाढलेली मजुरीसोबतच आता कच्चा मालावर जीएसटी आकारला जाणार असल्याने माती, पीओपी, काथ्या, रंग तसेच सजावटीच्या साहित्यात वाढ झाली आहे. परिणामी, यंदा गणेशमूर्ती महागणार आहे . तसेच ग्राहकांच्या मनासारखी मूर्ती देण्यासाठी लागणारे साचे महाग झाल्याने मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा महागाईची झळ बाप्पांच्या आगमनालाही बसणार आहे.