पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीत कोरोनावरील लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम आपल्या देशातच होणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल, असा  महत्त्वपूर्ण खुलासा ‘सीरम’चे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच देशात ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

पूनावाला यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोंदीसोबत कोरोना लसीवर सखोल चर्चा झाली. लसीकरणाच्या अंमलबजावणी, लसींच्या साठवणूक तसेच सीमरमधील सुविधांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. मात्र, लसीच्या किमतीवर चर्चा झाली नाही. लसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दर ठरवता येतील, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. जुलै २०२१ पर्यंत ३० कोटी लसींचं लक्ष्य असल्याचं पूनावाला यांनी सांगितलं. लस कशी वितरित करायची,  कुठे करायची, किती प्रमाणात करायची, किंमत किती असावी, किती डोस लागतील, याची चर्चा पंतप्रधानांसोबत झाली. लसीबाबत योग्य माहिती प्रसारित करा. आधी शासकीय यंत्रणा किंवा निर्मात्यांकडून माहितीची खातरजमा करून घ्या, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्याचंही आदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.

सरकारच्या मागणीनुसार लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल तर त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पुढील टप्प्यात लसीची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती पूनावाला यांनी दिली. लसीच्या पुरवठ्यासाठी साठवण्यासाठी लागणारी यंत्रणा सीरमकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. ६० टक्क्यांपर्यंत परिणामकारकता दिसून असून ही लस उत्तम आहे. चाचणीत एकालाही रुग्णालयात जावं लागलं नाही हे सगळ्यात महत्वाचं असल्याचं आदर पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.