मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमान खान जिथे राहतो त्या गॅलॅक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाला आहे. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता. यात सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही. दोन अज्ञात व्यक्तींकडून सलमानच्या घराबाहेर 2- 3 फायरिंग झाली असल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे तेथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणी फायरिंग केली आहे त्याचा पोलीस तपास करतच आहे अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारला धारेवर धरलें आहे. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय. पण सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे

काय म्हणाले संजय राऊत..?

“सलमान खान हे सिनेविश्वातील मोठं नाव आहे, म्हणून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारत आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार-खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेल्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून शिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय, त्यालाही सुरक्षा पुरवली जातेय. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय. पण सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे,” असं ते म्हणाले.

“सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि त्यांचं सरकार याची पोलखोल करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री राजकारणात अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं हेच आहे. पोलीस आयुक्त काय करत आहेत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना. त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही? की ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत? मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत,” अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे.