कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग सदैव तत्परतेने काम करीत आहे. यापुढे पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (शनिवार) येथे केले.

हातकणंगले येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गावात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सरपंचानी ग्राम विकासाच्या योजना उत्तमरितीने राबविण्यासाठी पुढे यावे. गावातील रस्ते, आरोग्य सुविधा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी यासारख्या कामांना प्राधान्य द्यावे. विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार विनय कोरे, आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पंचायत समितीचे सभापती दीपक पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.