नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी खूशखबर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली असतानाच सुत्रांवर विश्वास ठेवला तर, पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जनतेला दिलासा मिळू शकतो. यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात.

सरकारी तेल कंपन्या पुढील महिन्यात त्यांचे तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात. किमती कमी होण्याचे कारण म्हणजे कंपन्यांचा विक्रमी नफा. अहवालानुसार, सरकारी तेल कंपन्यांचा निव्वळ नफा 75 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांना कच्चे तेल स्वस्त मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्येही हे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते. अहवालानुसार, जर आपण 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत आतापर्यंत तीन कंपन्यांच्या एकूण निव्वळ नफ्याबद्दल बोललो तर तो 57,091.87 कोटी रुपये होता. 2022-23 च्या संपूर्ण आर्थिक वर्षातील ₹1,137.89 च्या एकूण नफ्यापेक्षा हे 4,917 टक्के अधिक आहे.